गोवंश तस्करांची कार उलटली, तीन जण जखमी

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : गोवंश तस्करांची कार उलटून तीन जण जखमी झाले. ही घटना  शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास महानुभाव आश्रम चौकात घडली. 
पोलिसांची नाकाबंदी भेदून एका कारचा थरारक पाठलाग करण्यात आला. पोलिसांना चकवा देऊन पळणार्‍या भरधाव होंडा सिटी कारचा महानुभव आश्रम चौकात दुभाजकाला धडकून अपघात झाला. या अपघातात कारमधील तीन तस्कर गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी कारमधून दोन गायींची सुटका केली. अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे. अमजद अहमद कुरेशी (रा. पडेगाव), अजहर अल्ताफ कुरेशी (३५, रा. पैठण गेट) आणि शेख मोसीन शेख रफिक (रा. शहानूरमियाँ दर्गा) अशी  आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.
शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास सातारा पोलिस ठाण्याचे कर्मचारी संताजी चौकीसमोर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत होते. यावेळी पैठणकडून शहराकडे येणार्‍या होंडा सिटी कारला (क्र. एमएच ४३-ए-६४५६) पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने गाडी न थांबवता ती भरधाव नाकाबंदी तोडून पुढे नेली. त्याच्यामागे एक एर्टिगा कारही सुसाट गेल्याने पोलिसांच्या पथकाने तातडीने दोन्ही वाहनांचा पाठलाग सुरू केला. महानुभव आश्रम चौकात नियंत्रण सुटल्याने कार जोरात दुभाजकाला धडकून उलटली. या अपघातात कारमधील अमजद कुरेशी, अजहर कुरेशी आणि शेख मोसिन हे तिघेही जखमी झाले. अमजद कुरेशी हा गंभीर जखमी झाल्याने रुग्णवाहिकेतून त्याला पोलिसांनी उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी अंमलदार देवचंद ब्रह्मनाथ यांच्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक दिलीप बचाटे करत आहेत.